मंगरूळजवळ एसटी बस, कार आणि दुचाकीची जोरदार धडक; गुजरातमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत
अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण तिहेरी अपघात घडून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस, गुजरात पासिंगची कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये गुजरात राज्यातील व्यारा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून ते अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होते.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पासिंगची सुझुकी स्विफ्ट कार (क्र. GJ 19 AF 3147), अमळनेर-चाळीसगाव एसटी बस (क्र. MH 13 CU 7540) आणि मोटारसायकल (क्र. MH 18 CD 8719) यांच्यात मंगरूळ गावाजवळ जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कार आणि दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत व्यारा (गुजरात) येथील नंदलाल गोपाल महाजन, निर्मला नंदलाल महाजन, सुरेश विक्रम महाजन आणि अनिता सुरेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलस्वार निलेश सुकदेव तावडे (रा. मालपूर, ता. शिंदखेडा) आणि फाल्गुनी एकनाथ भोई (रा. धरणगाव) यांचाही मृत्यू झाला.
अपघातात कारमधील आदित्य चंद्रकांत महाजन (रा. व्यारा, गुजरात) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस व आपत्कालीन यंत्रणांची तातडीची मदत
अपघाताची माहिती मिळताच ११२ आपत्कालीन सेवा, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच मंगरूळचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
आनंदाच्या प्रवासावर काळाचा घाला
साखरपुड्याच्या आनंददायी कार्यक्रमासाठी अमळनेरकडे निघालेल्या महाजन कुटुंबावर या भीषण अपघाताने दु:खाचा डोंगर कोसळला. एका क्षणात चार कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याने व्यारा आणि अमळनेर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे खालीलप्रमाणे
नंदलाल गोपाल महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) निर्मला नंदलाल महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) सुरेश विक्रम महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) अनिता सुरेश महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) निलेश सुकदेव तावडे (मयत रा. मालपूर तालुका शिंदखेडा) फाल्गुनी एकनाथ भोई (मयत रा. धरणगाव) असे आहे.
११२ ची तत्पर कारवाई
११२ डायल करताच अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे ,रवी पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील यांनी जखमींना १०८ रुग्णवाहिकेने उपचारसाठी रवाना केले. तर एक लहान मुलगा चार चाकीत अडकून पडला होता. एस टी मधील दीपक दिलीप पाटील जखमी झाला. गावकरी , पोलीस आणि एस टी कर्मचारी यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मृतांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.









