५ लाखांच्या मुद्देमालासह दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी):- चोपडा शहरातील चहाडी रस्त्यावरील कालिका माता मंदिराजवळ पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत विनापरवाना अवैध वाळूची (गौण खनिज) चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली आहे. चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी २४ मे २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद काशिनाथ पाटील (बकल नं. २१४५) हे रविवारी रात्री आपल्या पथकासह गस्तीवर होते. यादरम्यान चहार्डी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील कालिका माता मंदिराजवळ सार्वजनिक जागी एक विनानंबरी निळ्या रंगाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी किंवा रॉयल्टी पावती नसलेली एक ब्रास वाळू (रेती) आढळून आली. संशयित आरोपी शासकीय महसूल बुडवून वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचे ‘स्वराज ७४४ एक्सटी’ कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर, विनानंबरी निळी ट्रॉली आणि ६,००० रुपये किमतीची १ ब्रास वाळू असा एकूण ५,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून २४ मे २०२६ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि ४९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्यात ट्रॅक्टर चालक आकाश महाजन आणि ट्रॅक्टर मालक सागर कोळी या दोघांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनप्रतापराव देसले यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे करत आहेत.









