कानळदा रोडवरील अपघात; ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कानळदा रोडवर घडली. आदिल शाह जाकीर शाह (वय २०, रा. लक्ष्मीनगर, कानळदा रोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिल शाह हा ५ मे रोजी दुपारी (एमएच ४८ एएस ४०८३) क्रमांकाच्या दुचाकीने कानळद्याकडे जात होता. त्यावेळी समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच २९ एके १०१२) क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात आदिल शाह गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. उपचार घेतल्यानंतर त्याने ९ मे रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











