जळगाव एसपींची धडक कारवाई!
जळगाव (प्रतिनिधी):- आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ सुविधेबाबत हलगर्जीपणा करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. आलेल्या आपत्कालीन कॉल्सवर घटनास्थळी न जाता, जागेवरूनच कॉल बंद केल्याचा ठपका ठेवत जळगाव पोलीस अधीक्षकांनी संबंधित कर्मचाऱ्याची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश सुकलाल निकम (बकल नंबर १४७४) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निकम हे कर्तव्यावर असताना त्यांच्या ‘एमडीटी’ मशीनवर मदतीसाठी ३ कॉल्स आले होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने या कॉल्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
नियम आणि शिस्तीनुसार, आपत्कालीन कॉल आल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करणे अपेक्षित असते. परंतु, निकम यांनी घटनास्थळी न जाता, ज्या ठिकाणी ते होते त्याच ठिकाणाहून कॉल बंद केले. हा प्रकार पोलीस दलाच्या शिस्तीला आणि जनसेवेच्या तत्त्वाला धरून नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढलेल्या आदेशानुसार, निकम यांना तातडीने तालुका पोलीस स्टेशनमधून कार्यमुक्त करून पुढील आदेशापर्यंत ‘जळगाव नियंत्रण कक्ष’ येथे हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









