उद्या हायकोर्ट,सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी
जळगाव (प्रतिनिधी) :- अटलांटा प्रकरण अधिकच गंभीर व निर्णायक वळणावर पोहोचले असून दि. २७ रोजी एकाच वेळी हायकोर्ट मुंबई आणि सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दि. १७ मे रोजी हायकोर्टाने जळगाव महानगरपालिकेला ११ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला होता. मात्र ऐनवेळी लोकप्रतिनिधींच्या वतीने नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अॅडव्होकेट दिलीप पोकळे व अॅडव्होकेट शुचिता हाडा यांच्या माध्यमातून त्रयस्थ अर्जदार म्हणून हस्तक्षेप अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे महापौर दिपमाला काळे स्वतः न्यायालयात उपस्थित राहिल्यामुळे महानगरपालिकेला दहा दिवसांची मुदत मिळाली होती.
दरम्यान, महानगरपालिकेवर ११ कोटींचा तातडीचा भार पडू नये यासाठी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली असून, नवनिर्वाचित बॉडीच्या वतीने नगरसेवक अरविंद देशमुख हे सुप्रीम कोर्टात त्रयस्थ अर्जदार म्हणून बाजू मांडणार आहेत. हायकोर्टात अॅडव्होकेट दिलीप पोकळे व अॅडव्होकेट शुचिता हाडा हे महापालिकेची बाजू मांडणार आहेत. या कायदेशीर लढाईसाठी दोन स्वतंत्र टीम रवाना झाल्या असून, अरविंद देशमुख व विजय जगताप हे दिल्लीकडे सुप्रीम कोर्टासाठी रवाना झाले आहेत. तर अॅडव्होकेट दिलीप पोकळे, नगरसेवक हर्षल मावळे व अॅडव्होकेट शुचिता हाडा हे मुंबईकडे हायकोर्टासाठी रवाना झाले आहेत.
याचबरोबर, अटलांटा कंपनीविरोधात नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तब्बल ४१ कोटी ३० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जळगाव महानगरपालिकेचेच अटलांटा कंपनीकडे पैसे येणे बाकी असताना, संबंधित कंपनीने न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करत उलट महानगरपालिकेकडून ११ कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला “न्यायालयीन खेळी”चे स्वरूप प्राप्त झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
अटलांटा प्रकरणातील ही दुहेरी सुनावणी आणि फौजदारी तक्रार यामुळे प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









