‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’चा संकल्प
शिरसोली (वार्ताहर):- जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज २५ एप्रिल रोजी शिरसोली प्रबो येथे ‘जागतिक हिवताप दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात आली.


प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसावद येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमात आरोग्य पर्यवेक्षक रोहित देशमुख आणि आरोग्य सेवक एस. आर. पिंजारी यांनी ग्रामीण जनतेला हिवतापाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
नागरिकांना हिवतापाची लक्षणे, तापाचे प्रकार, वेळेत तपासणी, अचूक निदान आणि उपचार याबद्दल माहिती देण्यात आली. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे आणि वैयक्तिक संरक्षणाचे उपाय यावर भर देण्यात आला. हस्तपत्रिका (पॅम्प्लेट) आणि बॅनरच्या माध्यमातून गावातील ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली.
यंदाच्या जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य “Driven To End Malaria: Now We Can. Now We Must” (मलेरिया निर्मूलनासाठी कटिबद्ध: आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे) यावर आधारित आरोग्य शिक्षण देण्यात आले. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’
यावेळी केवळ हिवतापच नव्हे, तर संपूर्ण गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमाची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. गावकरी आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने गाव आजारमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या मोहिमेसाठी आरोग्य सहाय्यक रोहित देशमुख आणि सलीम आर. पिंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









