जळगावात जादा नफ्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला घातला गंडा
जळगाव ( प्रतिनिधी ):- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याची ३९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील महाबळ रोडवरील नागेश्वर कॉलनीतील रहिवासी समीर नटवरलाल शहा (वय ६२) यांना १६ मे २०२५ ते ३ मार्च २०२६ या कालावधीत काही व्यक्तींनी संपर्क साधला. यात काहिरा मेहता (Qahira Mehta), हेमंत मेहता (Hemant Mehta) आणि सीइपीटी (CPT) कस्टमर सर्विसच्या प्रतिनिधींनी ‘सीइपीटी शेअर्स मार्केटिंग कंपनी, युके’ (CPT Shares Marketing Company UK) चे मॅनेजर असल्याचे भासवले.
संशयित आरोपींनी समीर शहा यांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला शहा यांनी भरलेल्या रकमेवर त्यांना १०,००० रुपयांचा नफा देखील परत दिला. यामुळे शहा यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडले. अशा प्रकारे समीर शहा यांच्याकडून एकूण ३९,००,००० (एकोणचाळीस लाख) रुपये ऑनलाईन भरून घेतले. मात्र, त्यानंतर कोणतीही रक्कम किंवा नफा परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शहा यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी समीर शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० एप्रिल २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे स्वतः करत आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सावध राहावे आणि अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.









