पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ):- तालुक्यातील गोंडवस्ती येथे गल्लीत सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी घराच्या दरवाजाबाहेर आलेल्या एका महिलेवर चौघांनी दगडफेक करत लाठ्याकाठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकारणी पाचोरा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीबेन बहादूरभाई उईके (वय ५६, रा. गोंडवस्ती, पाचोरा; मूळ रा. जुनागड, गुजरात) या १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घरी होत्या. त्यावेळी गल्लीमध्ये भांडण सुरू असल्याने त्या काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी दरवाजाबाहेर आल्या. यावेळी तेथे असलेल्या अडिया लक्ष्मण अट्रम याने त्यांच्यावर दगड भिरकावला. पाठोपाठ कनूसेठ गुंगे मरापे, कृष्णा गुंगे मरापे आणि विष्णू गुंगे मरापे (सर्व रा. गोंडवस्ती, पाचोरा) यांनी देखील दगडफेक करण्यास सुरुवात केली.
संशयित आरोपींनी केवळ दगडफेकच केली नाही, तर लाकडी काठीने लक्ष्मीबेन यांच्या मांडीवर व पायावर जबर मारहाण केली. तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. या मारहाणीत लक्ष्मीबेन जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी लक्ष्मीबेन उईके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अडिया अट्रम, कनूसेठ मरापे, कृष्णा मरापे आणि विष्णू मरापे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भोजराज धनगर पुढील तपास करीत आहेत.









