एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील कासमवाडी परिसरात गावठी कट्टा आणि धारदार कोयता बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे आणि मोटारसायकलसह एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दि. १४ एप्रिल २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, कासमवाडी परिसरात दोन इसम घातक शस्त्रांसह फिरत आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कासमवाडी ते नेरी नाका रोडवरील एकता चौकाजवळ सापळा रचला. एका मोटारसायकलवर दोन तरुण येताना दिसले असता, पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा, मॅगझिन आणि लोखंडी धारदार कोयता मिळून आला.
रोहीत गोपाळ कुंवर (वय २२, रा. अष्टभुजा देवी मंदिराजवळ, कासमवाडी) व सागर रामा सोनवणे (वय २१, रा. मेस्को माता नगर, आसोदा रोड, जळगाव) यांच्याकडून २० हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा,
५० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल, लोखंडी धारदार कोयता, ५०० रुपये किमतीचे रिकामे मॅगझिन असे एकूण किंमत ७०,५०० रुपये रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.









