जळगावात चिंचोली येथे एसीबीची धडाकेबाज कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना कशा प्रकारे लुबाडले जाते, याचा प्रत्यय आज चिंचोली येथे आला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने गृह उपयोगी संच वाटप करण्यासाठी ‘केवायसी’ (KYC) करण्याच्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

जळगाव येथील एका तक्रारदाराने ९ एप्रिल रोजी शासनाच्या योजनेअंतर्गत गृह उपयोगी संच मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार १५ एप्रिल रोजी त्यांना चिंचोली (ता. जि. जळगाव) येथे संच ताब्यात घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. तिथे हजर राहिल्यावर संच मिळण्यापूर्वी तुमची केवायसी करावी लागेल आणि त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपी महिला लोकसेवक आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजी नगर, जळगाव) हिने केली.
लाचेची मागणी झाल्यामुळे तक्रारदाराने तत्काळ जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, सापळा रचला असता आसमा शेख यांनी पंचांसमक्ष १०० रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कारवाई दरम्यान आरोपी महिला बसत असलेल्या टेबलाखालील पत्राच्या पेटीमध्ये ४१,२५०/- रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. इतर लाभार्थ्यांकडूनही अशाच प्रकारे रक्कम गोळा करण्यात आल्याचा संशय यामुळे बळावला आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सअप क्रमांक ७५८८६६१०६४ वर संपर्क साधावा.








