यावल-फैजपूर रस्त्यावर घटना
यावल (प्रतिनिधी): यावल-फैजपूर रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या कंटेनरने दिलेल्या धडकेत ६९ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय पांडुरंग जाधव (वय ६९, रा. साने गुरुजी शाळेजवळ, यावल) हे २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:५० वाजेच्या सुमारास यावल-फैजपूर रोड ओलांडत होते. याच वेळी भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच ४० सीएम १४४२) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून जाधव यांना जोराची धडक दिली. भीषण अपघातात दत्तात्रय जाधव यांच्या डोक्याला, पायाला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गर्दी झाली होती.
याप्रकरणी योगेश अशोक चव्हाण (वय ३६, रा. शिवाजी नगर, यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आरोपी चालक प्रेमसिंग मोतीलाल सिसोदिय (वय ३०, रा. सुसनेर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करत आहेत.









