जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक मोहीम राबविली आहे. दिनांक ३ रोजी रात्रीपासून ते ४ रोजी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत पोलिसांकडून व्यापक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अवैधरित्या सुरू असलेल्या अनेक हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्याने अवैध दारू व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ३ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ४ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिस पथकांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले.
या कारवाईमुळे गावोगावी लपूनछपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांकडून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांकडून सातत्याने सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे अवैधरित्या हातभट्टी चालविणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली आहे.











