धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे बायपासच्या कामाजवळ पहारेकरी वृद्ध व्यक्तीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र येथे घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
भाईदास नारायण भोई (वय ७०, रा. पाळधी ता. धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गावात पत्नी, २ मुले, ३ मुली यांचेसह राहत होते. पाळधी गावाजवळ बायपास रस्त्याचे काम सुरु आहे.(केसीएन)या कामाच्या ठिकाणी मशिनरी सांभाळण्यासाठी भाईदास भोई हे पहारेकरी म्हणून नेमणुकीस आहेत. बुधवारी रात्री ८ वाजता घरी जेवण झाल्यावर भाईदास हे कामाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात ट्रकने भाईदास यांना जबर धडक देऊन पसार झाला.
पाळधीच्या ग्रामस्थांनी भाईदास यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी परिवाराने आक्रोश करून शोक व्यक्त केला. भाईदास भोई यांच्या अपघाती निधनामुळे पाळधी गावावर शोककळा पसरली आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.