यावल तालुक्यातील राजोरा फाट्याजवळील घटना
यावल ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील राजोरा फाट्याजवळ झालेल्या रुग्णवाहिका आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार दांम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. जखमींना तात्काळ भुसावळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावल तालुकयातील शिरसाड येथील विजय भास्कर अटवाल (वय ५८) हे पत्नी अलकाबाई विजय अटवाल (वय ५३) यांच्यासोबत (एमएच १९, ६६२९) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळला लग्नासाठी जात होते. राजोरा फाट्याजवळ भुसावळकडून येणाऱ्या रुग्णवाहिकेला त्यांच्या दुचाकीची धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अटवाल दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
रुग्णवाहिका चालकाने तातडीने जखमी अवस्थेतील या दांपत्याला त्याच रुग्णवाहिकेतुन भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोघांवर उपचार करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.