जळगाव शहरातील डॉ.आंबेडकर नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जुने जळगाव परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर भागात बुधवारी सकाळी ९ वाजता एका मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने पानटपरीला जोरदार धडक दिली. अपघातात पान टपरीजवळ उभे असलेला इसम आणि टपरी चालक महिला गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगावच्या जुने जळगाव परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर भागात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या काँक्रिटीकरणाच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या मालवाहू (एमएच १९, एस.६७७७) वाहनाने बुधवारी सकाळी ९ वाजता रस्त्यावरील पान टपरीला जोरदार धडक दिली. या पान टपरीवर उभे असलेले संजय बबन सोनवणे (वय ४५, रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर) यांना धडक दिली. तसेच पानटपरीला धडक दिल्यामुळे पानटपरी चालक महिला मराबाई बाबुराव सोनवणे (वय ६०) यांनाही दुखापत झाली. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांनी दाखल केले. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे. चालकाने पानटपरीला धडक दिल्यानंतरही वाहनाचा वेग नियंत्रणात आणता आला नाही, सुदैवाने वेगात जाणारे वाहन विद्युत रोहित्रच्या खांबाला जाऊन धडकली. यामुळे वाहन बंद पडले. अपघात घडल्यानंतर चालकाने पळ काढला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.