धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील वाघळूद खुर्द शिवारातील शेतातून शेतकऱ्याच्या विहिरीतील १५ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत धरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सुरेश दौलत पाटील (वय-६२) रा. वाघळूद खुर्द, ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाघळूद खुर्द शिवारात शेत गट नंबर २१ मध्ये त्यांचे मालकीचे शेत आहे. या शेतात विहीर असून शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर एम.टेक. कंपनीची ३ एचपीची मोटार बसवलेली आहे. २ ते ३ जानेवारी दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी सुरेश पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु पाण्याची मोटर संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.