जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉड आणि पोटात चाकू खुपसून मोहन विजय हडपे (वय – १८) या तरुणाचा १२ ऑक्टोबर रोजी खून झाल्याची घटना घडली होती. यातील फरार संशयित साजीद मुसा खाटीक (रा. वाघळी) याला मध्यप्रदेशातील खेतीया येथून जळगाव स्थानिक गुन्हे पथकाने शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील मोहन विजय हडपे (वय १८) याचा गावातीलच सय्यद मुसा खाटीक, साजिद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजिद खाटीक, समीर सय्यद खाटीक यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून व पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित साजिद मुसा खाटीक हा फरार होता. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान संशयताचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झाले होते. संशयित मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या खेतीया गावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयिताला अटक करण्यासाठी पथक रवाना केले. पथकाने मध्यप्रदेशात जाऊन खेतीया येथून संशयित साजीद मुसा खाटीक याला ताब्यात घेण्यात आले.