बंगळुरू (वृत्तसंस्था) – दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुतून एका 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्टला अटक केली आहे. दिशा रवी असे तिचे नाव असून, ती फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक आहे. दिशावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
हे टूलकिट तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा स्वीडनची पर्यावरण बदल कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने याला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. ग्रेटाने टूलकिट शेअर करण्यासोबतच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूलकिटबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
ग्रेटाने 3 फेब्रुवारीला ट्वीट करुन शेतकरी आंदोलानाला पाठिंबा दिला होता. तिने यात एक टूलकिट शेअर केली होती. यात 26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाची माहिती होती. यानंतर ट्विटरने ग्रेटाचे ते ट्विट्स डिलीट केले होते.
यानंतर बातम्या आल्या होत्या की, दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, एफआयआरमध्ये कोणत्या ठराविक व्यक्तीचे नाव लिहीले नाही.