नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कच्च्या तेलाच्या बाजारातील जगातील सर्वात मोठा आयातदार असलेल्या चीनने या तेलाची मागणी बेसुमार वाढवली आहे. यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. काल ब्रेंट क्रूड 62 डॉलर प्रति बॅरलच्याही पलीकडे गेले. कोरोनाच्या काळातच फक्त ही किंमत इतकी चढी होती. स्थानिक बाजारात सलग पाचव्या दिवशी दोन्ही इंधनांच्या किंमती वाढल्या आहेत.
दिल्लीत शनिवारी पेट्रोल 30 पैशांनी वाढून 88.44 रुपयांवर तर डिझेल 36 पैशांनी वाढून 78.74 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.हे नवे वर्ष पेट्रोलियम इंधनांच्या किंमतींसाठी वाईट दिसत आहे. गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात फक्त 17 दिवसच या इंधनांच्या किंमती वाढल्या आहेत, पण इतक्या कमी दिवसांत ही किंमत 04.63 रुपयांनी वाढली आहे.
मुंबईत तर पेट्रोलने 95 रुपयांच्या जवळ मजल मारली आहे. याआधी गेल्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतही पेट्रोलच्या किंमती खूप वाढल्या होत्या. गेल्या दहा महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत जवळपास 18 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.
पेट्रोलसोबतच डिझेलही विक्रमी किंमत गाठण्याच्या तयारीत आहे. कालच डिझेल 35 पैशांनी वाढले होते, आता त्यात आणखी 36 पैशांची भर पडली आहे. नव्या वर्षाच्या 17 दिवसांदरम्यानच डिझेल 04.87 रुपये प्रति लिटरने वाढले आहे. हा एक सर्वकालीन उच्चस्तर आहे. गेल्या 10 महिन्यात डिझेलच्या किंमतीत 16 रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे.