मुंबई (वृत्तसंस्था) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी आता अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले कि, या आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचे कोणीही नाव घेत नाही. कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईल.
भाजपच्या नेत्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. हा त्यांचा धंदा आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीसुद्धा सीडी बाहेर काढणार असल्याचे म्हटले होते . पण आम्हाला हे योग्य वाटत नाही. एकमेकांवर चिखलफेकीचे प्रकरण बंद झाले पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जावा आणि पूजाला न्याय द्यावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.