जळगावातील घटनेने समाजमन झाले सुन्न !
जळगाव ;- सततच्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पोटच्या मुलाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शहरातील बालाजीपेठ येथे घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे . सौरभ सुभाष वर्मा वय २६ रा. बालाजीपेठ असे मयत मुलाचे नाव असून सुभाष वर्मा असे पित्याचे नाव आहे . त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजार होऊन खुनाची कबुली दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
सौरभ सुभाष वर्मा वय 26 रा. बालाजीपेठ हा दोन भाऊ, आई-वडिलांसह राहत होता. सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात भांडण घालण्याची त्याला सवय होती .१२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ हा घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील सुभाष बन्सीलाल वर्मा यांचे जोरदार भांडण झाले . त्यात सौरभने हातातील चाकु काढून वडिलांना धमकावत असल्याने त्याच्या वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला. यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस स्टेशनला स्वतःहून हजर झालेले असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली .