यावल पोलिसांत गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी):- यावल तालुक्यातील अट्रावल गावात केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अट्रावळ गावातील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक ३ मध्ये ‘प्रशिक केळी सप्लायर्स’ नावाचे दुकान आहे. फिर्यादी आकाश सुधाकर तायडे (वय ३४, व्यवसाय – केळी व्यापारी, रा. अट्रावल ता. यावल) यांनी दुकानातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ५० हजार रुपयांची रोकड ठेवली होती. या रकमेत ५०० रुपयांच्या १०० नोटांचा समावेश होता.


दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान अज्ञात आरोपीने दुकानात प्रवेश करून ही रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. नरेंद्र बागुले हे करीत असून अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही. चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.








