बीड (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली. मात्र अंतिम यादी येईपर्यंत चर्चेत असलेल्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं. याचे पडसाद आता बीडमध्ये उमटत आहे.
मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.
दरम्यान पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त दोन दिवसांपासून येत आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी नाराज नसल्याचं म्हटलं. मात्र ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या व्यतिरिक्त शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.