नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना संसर्गाने मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही करोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. देशातील दुसरी लाट आता काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तिसऱी लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांना करोना संदर्भात इशारा दिला आहे.
अनेक देशांनी करोना रुग्णसंख्या कमी होताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. मात्र करोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मागील दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूचा दर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील २४ तासात पाच लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. ही काही करोना आटोक्यात आल्याची चिन्हं नाहीत, अस स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान करोनाचा डेल्टा व्हेरियंट अत्यंत घातक आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण करोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ एवढं असल्याचं त्यांनी म्हटलं.