जळगाव (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याचा 75 वर्ष अमृत महोत्सव पूर्ण होत असल्याने वित्त विभागाने जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 2021-22 चे वार्षीक हिशोब हा त्वरीत उपलब्ध व्हावा या दृष्टीने अथक प्रयत्न करून काही मिनिटात वार्षीक हिशोब मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारा 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सोयीचे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याच दृष्टीने भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी यांचे सन 2021-22 चे शिल्लकेचे उतारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबधित कर्मचारी यांना दि.15 ऑगस्ट 2022 पासून जिल्हा परिषदेच्या http://zpjalgaon.gov.in/ या संकेतस्थळावर जावून एका क्लिकवर हे उतारे बघता येणार आहेत. व त्यांची प्रिंट देखील काढता येणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. बाबुलाल पाटील, उपमुख्य व लेखा व वित्त अधिकारी श्री. राजेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदर लेखे पूर्ण करण्यासाठी लेखाधिकारी श्री. दिलीप वानखेडे, कनिष्ठ लेखाधिकारी श्री. किरण पाराशर व सर्व भविष्य निर्वाह निधी शाखेतील कर्मचारी यांनी अल्प कालावधीत परिश्रम घेतले.
दरम्यान, संबधित खाते उता-यांमध्ये काही दुरूस्ती आढळल्यास एक महिन्याच्या आत विभागप्रमुखांमार्फत अर्थ विभागाच्या भविष्य निर्वाह निधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. बाबुलाल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना केले आहे.