एरंडोल शहरातील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : येथील साई नगरमध्ये २२ वर्षीय उच्चशिक्षित युवकाने घराबाहेरील पोर्चमध्ये लोखंडी अँगलला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना दि. १९ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मृत तरुण हा कुटुंबातील एकटाच मुलगा असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय समाधान देवरे (वय २२, रा. साईनगर, एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचें वडील समाधान हे आदिवासी मुलांच्या शासकिय वसतिगृहात चतुर्थ कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अक्षय देवरे याने सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून अविवाहित होता. दरम्यान, समाधान देवरे हे अक्षय देवरे व कुटुंबीयांसह भडगाव तालुक्यातील वाक येथे नातेवाईकांकडील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर समाधान देवरे व त्यांचा मावसभाऊ हे दोघे दुचाकीने एरंडोलला परत येत होते.
अक्षय हा मंडपाच्या गाडीमधून एरंडोल येथे परत येत होता. तो त्याच्या वडिलांच्याआधीच एरंडोल येथे पोहोचला. दरम्यान, समाधान देवरे व त्यांचा मावसभाऊ घरी पोहोचल्यावर अक्षय याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे त्यांना दिसून आले. त्याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या प्रकरणी एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो.नि. सतीष गोराडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार सुनील लोहार, अनिल पाटील, मिलिंद कुमावत करत आहेत.