जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश
जळगांव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध वाळू व्यवसायिक व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या दोघांसह जिल्ह्यातील चार जणांना अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दि. १९ एप्रिल रोजी सहा जणांना स्थानबद्ध करण्याचे म्हणजेच एमपीडीएचे आदेश दिले आहेत.
नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विशाल उर्फ विकी उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा. शंकरराव नगर, जळगाव) आणि संदीप गणेश ठाकूर (वय ३०, रा. शंकरराव नगर, जळगाव) यांच्यावर वाळू चोरी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार या संदर्भामध्ये विविध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या अनुषंगाने ते धोकादायक व्यक्ती या व्याख्येत मोडत असल्याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनने पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता.
अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत विलास वामन कोळी (वय ३८, रा. जळगाव खुर्द) याच्यावर ९ गुन्हे, शांताराम सुका बोरसे (वय ४५, रा. इंदिरानगर, जळगाव खुर्द) यांच्यासह रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील छायाबाई रमेश सकट (वय ५८, रा.राजीव गांधी नगर) व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भैया मंगल पाटील (वय ३०, रा. अरुण नगर, चोपडा) यांच्याविरुद्ध स्थानपद्धतीचे प्रस्ताव संबंधित पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक साहेबांकडे पाठवले होते.
सर्व प्रस्तावांचे अवलोकन संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर हे प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजूर करून सदर सहा गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याबाबत आदेश दिले आहे. यात विशाल उर्फ मांडवा सपकाळे याला मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, संदीप ठाकूर याला येरवडा कारागृह, पुणे, विशाल कोळी याला ठाणे मध्यवर्ती कारागृह, शांताराम बोरसे याला मुंबई मध्यवर्ती कारागृह, छायाबाई सकट हिला अकोला महिला मध्यवर्ती कारागृह, चोपड्याच्या भैय्या पाटील याला नागपूर कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर स्थानपद्धतीचे प्रस्तावकामि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सफौ.युनूस शेख, पोहेको सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रईस शेख, ईश्वर पाटील आदींनी काम केले.