अन्यथा आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) :- शेततळे निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना सेवेतून निलंबित करून निविदा प्रक्रियेची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरचंद्र पवार) ने दिला आहे. यासंदर्भात जळगाव महानगर युवक पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता भदाणे यांची भेट घेवून निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नियंत्रणात वाघूर धरण विभाग,जळगाव यांचे अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे शेततळे तयार केले जात आहे. या शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे आमिष दाखवून वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांनी ४५ लाख रुपयांची अन्य साथीदार यांच्याशी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश जळगाव येथील न्यायालयाने दिनांक ९ जुलै रोजी दिलेले आहेत.
कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांनी जिव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड या हैद्राबाद येथील कंपनीची शेततळे कामांची निविदा मंजूर करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला आहे. सदरच्या कंपनीला मध्यप्रदेश राज्यातील इंदिरा सागर परियोजना सागरचे मुख्य अभियंता यांनी काळ्या यादीत टाकले असताना ती बाब दडवून ठेवावी यासाठी गोकुळ महाजन यांनीच सदरच्या कंपनीला सहकार्य केले आहे. हा गंभीर विषय असून मर्जीतल्या ठेकेदारांना मक्ता मिळावा यासाठी कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांनी शासकीय कर्तव्यात हयगय करून सेवा शिस्तीचे उल्लंघन केले आहे.
यामुळे तापी पाटबंधारे विकास मंडळ यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,सातत्याने वादग्रस्त असलेले गोकुळ महाजन यांनी शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाने आपल्या सहकारी साथीदार यांच्याशी संगनमत करून जळगाव येथील एका व्यक्तीची ४५ लाख रुपयांत फसवणूक केल्याबाबत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
गोकुळ महाजन यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून शेततळे निविदा कामांची विशेष तपास यंत्रणा मार्फत चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी ७ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जळगाव महानगर अध्यक्ष रिकु चौधरी यांच्या नेतृत्वात हितेश जावळे, चेतन पवार, शैलेश अभंगे, ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









