यावल (प्रतिनिधी):- तालुक्यातील शिरसाड येथे घरासमोरील विहिरीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचे नाव राजेश रमेश भिलाला (वय २०, रा. शिरसाड, ता. यावल) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हा मंगळवारी घराबाहेर असताना घरासमोरील विहिरीजवळ गेला होता. यावेळी विहिरीत डोकावत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट विहिरीत कोसळून पाण्यात बुडाला.
घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत राजेशला विहिरीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.
या घटनेमुळे भिलाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रमेश भिलाला यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहील गणेश करीत आहेत.









