अवघ्या ७ मिनिटांच्या प्रतिसाद वेळेसह नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक; जूनमध्ये २,८४८ आपत्कालीन कॉल्सना दिली तातडीची मदत
जळगाव ( प्रतिनिधी ) – आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने जळगाव पोलीस दलाने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. डायल ११२ आपत्कालीन सेवेत जून २०२६ महिन्यात जळगाव जिल्ह्याने नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कार्यक्षम आणि तत्पर पोलीस व्यवस्थेची छाप उमटवली आहे.

विशेष म्हणजे, जळगाव पोलिसांनी अवघ्या ७ मिनिटांच्या Final Response Timing सह नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सर्वात वेगवान प्रतिसादाची नोंद केली आहे.
जून २०२६ दरम्यान जळगाव जिल्ह्यातून डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर एकूण २ हजार ८४८ कॉल्स प्राप्त झाले. प्रत्येक घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस यंत्रणेने तातडीने प्रतिसाद देत नागरिकांना शक्य तितक्या कमी वेळेत मदत पोहोचविण्याचे काम केले.
नाशिक परिक्षेत्रातील जिल्हानिहाय प्रतिसाद वेळ
– जळगाव – ७ मिनिटे
– नंदुरबार – ८ मिनिटे ३३ सेकंद
– धुळे – ८ मिनिटे ३९ सेकंद
– नाशिक ग्रामीण – १० मिनिटे ०९ सेकंद
– अहिल्यानगर – १४ मिनिटे १९ सेकंद
या आकडेवारीवरून जळगाव पोलिसांची प्रतिसाद यंत्रणा परिक्षेत्रातील सर्वाधिक वेगवान आणि परिणामकारक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डायल ११२ व्यवस्थेचा सखोल आढावा घेत नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे आणि प्रतिसाद पथकांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्यावर भर दिला. प्रत्येक आपत्कालीन कॉलला प्राधान्याने प्रतिसाद देऊन घटनास्थळी कमीत कमी वेळेत पोहोचण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कॉलवर तत्परतेने प्रतिसाद दिला. परिणामी अनेक नागरिकांना संकटाच्या क्षणी वेळेत मदत मिळाली आणि पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.
अपघात, गुन्हे, महिला सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित घटनांमध्ये डायल ११२ सेवा नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. एका फोनवर तातडीने मदत उपलब्ध करून देणारी ही सेवा जळगाव जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कार्यरत असल्याचे या कामगिरीतून सिद्ध झाले आहे.









