खंडव्याजवळ कारचा भीषण अपघात
भुसावळ (प्रतिनिधी):- मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वरणगाव आणि दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली आहे.

श्याम विक्रम ठाकूर (वय ४५), शोभा विक्रम ठाकूर (वय ६०) व शिवन्या श्याम ठाकूर (वय ५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आपल्या मूळ गावी परत येत असताना पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चालक श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला.
उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या शोभाबाई ठाकूर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या हिला बर्हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असताना तिचीही प्राणज्योत मालवली. अपघातातील अन्य चार जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दर्यापूर शिवारातील गणेश नगर आणि वरणगाव फॅक्टरी परिसरात या भीषण अपघाताची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठाकूर कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.









