धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील प्रकाराने खळबळ
धरणगाव (प्रतिनिधी) : गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालाने फोटो काढले. त्यावर तेथील वाळूमाफियाने हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चांदसर ता. धरणगाव येथे मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. तो रोखण्यासाठी गावाबाहेर चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाकटुकी येथील काहीजण चाऱ्या बुजवत होते. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले. त्यांनी तेथे जाऊन त्यांना त्याचा जाब विचारला. याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाल कोळी यानी त्यांच्याजवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी तेथे एकच खळबळ उडाली.
तर गावात त्याचा आवाज झाल्याने तेथेही धावपळ उडाली. हवेत गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले. माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्राचे पोलिस गावात पोहोचले. याबाबत पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी (सर्व रा. चांदसर, ता. धरणगाव) तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी (दोन्ही रा. वाकटुकी, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सपोनि प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे व सहकारी करीत आहेत. घटनास्थळी चोपडा भागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी घोलप, पो. नि. पवन देसले यांनी भेट दिली. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.