तालुका कृषी कार्यालयात नुकसानीची तक्रार लवकर देण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील काही भागात शुक्रवारी दि. ७ रोजी वादळी वाऱ्याने केळी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला व विमा कंपनीला विनंती केली. मात्र कोणी लक्ष देत नसल्याचे पाहून अखेर शेतकऱ्यांनी माजी खा. उन्मेष पाटील व पारोळा लोकनियुक्त नागराध्यक्ष करण पवार पाटील यांना संपर्क केला. उन्मेष पाटील यांनी प्रशासनाला संपर्क करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.
शेतकऱ्यांनी माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांना दि.८ जून रोजी सकाळी दूरध्वनीद्वारे संपर्क करून झालेल्या नुकसानीबाबत कल्पना दिली. त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील यांना संपर्क साधून तात्काळ ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने प्राप्त तक्रारी नुसार पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांनी देखील आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ ७२ तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनी किंवा ऑफलाइन पद्धतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करण्यात बाबतचे आव्हान माजी खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांनी केले आहे.