वनविभागाकडून ठोस कारवाई नसल्याचा आरोप; नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
चोपडा (प्रतिनिधी) :-चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक गावात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी गावाजवळ आणि शेत परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, एका वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांची चिंता अधिक वाढली आहे.

शेतात बिबट्या दिसल्याने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, तावसे बुद्रुक येथील विनोद हुकुमचंद पाटील यांच्या शेत परिसरात रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास बिबट्या दिसून आला. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. ही माहिती गावात पसरताच अनेकांनी रात्री बाहेर पडणे टाळले.
गोठ्यातील वासरावर हल्ला
दरम्यान, गावातील आप्पा कोळी यांच्या गोठ्यातील वासराची बिबट्याने शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वनविभागाने पाहणी केली; मात्र कारवाईची प्रतीक्षा
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. “बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक बंदोबस्त करण्यात येईल,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सततच्या बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरत आहेत. विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी
बिबट्याला तातडीने जेरबंद करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तावसे बुद्रुक येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, रात्री बाहेर फिरणे टाळावे आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.









