
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट


गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाचा कठोर इशारा
एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिर हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत नदीपात्रात तयार ठेवण्यात आलेले वाळूचे तराफे जाळून नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात कठोर भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे उत्राणचे मंडळ अधिकारी नदीम शेख आणि उत्राण अहिरचे ग्राम महसूल अधिकारी रविराज पाटील यांनी ख्वाजा मिया दर्गा परिसरातील नदीपात्राची संयुक्त पाहणी केली.
पाहणीदरम्यान नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतुकीसाठी तयार ठेवण्यात आलेले वाळूचे तराफे आढळून आले. त्यानंतर महसूल पथकाने तातडीने कारवाई करत घटनास्थळीच हे तराफे जाळून पूर्णपणे नष्ट केले.
या कारवाईनंतर परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीत गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनाने तालुक्यात अवैध वाळू उपसा, साठा किंवा वाहतूक आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.









