
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास
२.१६ कोटींचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव


जळगाव | प्रतिनिधी
चोरीला गेलेल्या वाहनांपासून ते सोने-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असा तब्बल २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात देत जळगाव जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकला. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘मुद्देमाल सुपूर्दगी’ कार्यक्रमात हा मुद्देमाल मान्यवरांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कष्टाच्या कमाईचा सन्मान
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चोरीला गेलेला मुद्देमाल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून नागरिकांच्या कष्टाच्या कमाईचा सन्मान आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंशी अनेकांच्या भावना जोडलेल्या असतात. त्या वस्तू परत मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा पोलीस दलासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे तपास अधिक सक्षम
गिरीश महाजन यांनी पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक करताना आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हे उघडकीस आणण्याची क्षमता वाढल्याचे सांगितले. शासन पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे असून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव हा त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांचा विश्वास अधिक बळकट
आमदार सुरेश भोळे यांनी मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमेमुळे चोरीला गेलेला माल पुन्हा मिळू शकतो, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले. पोलीस दलाच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
या कार्यक्रमात जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ आणि जिल्हा सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त प्रयत्नातून शोधण्यात आलेला मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, विधी व न्याय विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील तसेच गुन्हे तपासात मोलाचे सहकार्य करणाऱ्या नागरिकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रास्ताविकातून मोहिमेची माहिती दिली. सूत्रसंचालन पोलीस हवालदार अमित माळी यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी मानले.
क्रीडा संकुलातील नव्या सुविधांचे लोकार्पण
याच कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील नूतनीकरण करण्यात आलेल्या क्रीडा मैदानाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
नूतनीकरणामध्ये ४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी, सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट, हिरवळयुक्त मैदान, आरओ पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण करण्यात आले असून हे मैदान आता खेळाडूंसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.









