माजी खा. उन्मेष पाटलांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : कापूस भाववाढीचे धोरण, दुष्काळाचे रखडलेले अनुदान, शेतकऱ्यांना स्मार्ट मीटरची सक्ती, ज्वारी खरेदीचे जिल्ह्याला कमी असलेले उद्दिष्ट अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दिनांक २१ जून रोजी जिल्हाभरात व तालुकास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.
जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले. शासनाकडून कापूस भावासाठी योजनेची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ही योजना शासनाकडून राबविण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे.
ती सक्ती करण्यात येऊ नये, ज्वारी खरेदीसाठी जळगाव जिल्ह्याला ३० हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते दीड लाखापर्यंत करण्यात यावे, शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपयांचे शासनाकडून मिळणारे अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.