जळगाव (प्रतिनिधी) : पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून, जळगाव जिल्ह्यात १३७ जागांसाठी दिनांक १९ जूनपासून मैदानी चाचण्यांना सुरुवात होत आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी उमेदवारांची रांग पाहायला मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी त्याचा आढावा घेतला.
जळगाव जिल्ह्यात पोलिस शिपाई या पदासाठी १३७ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी धावण्याच्या चाचणीसाठी ४०० मीटरचे चार ट्रॅक तयार करण्यात आले आहे. पावसामध्ये त्यावर पाणी साचू नये यासाठी मुरुम टाकून त्याची उंची वाढविण्यासह त्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे. या वेळी कोण किती वेळात किती धावले, याच्या अचूक नोंदणीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप लावण्यात येणार आहे.
पोलीस भरती प्रक्रियेसाठी ६ हजार ५५७ अर्ज आलेले आहे. आजपासून मैदानी चाचण्यांना सुरुवात होणार आहे. १९ रोजी पहिल्या दिवशी ५०० पुरुष, तर गुरुवारी २० जून ते २३ जून दरम्यान प्रत्येक दिवशी एक-एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे.पहाटे ४:३० वाजताच मैदानी चाचणीसाठी हजर रहावे लागणार असल्याने बाहेरगावाहून येणारे उमेदवार जळगावात दाखल झाले आहे.