अपघातावर मात करत डॉ. नितू पाटील पुन्हा शस्त्रक्रियेसाठी सज्ज; ३२ हजारांहून अधिक रुग्णांना दिली नवी दृष्टी
जळगाव : इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर संकटांवरही मात करता येते, याचा प्रत्यय डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आणि नर्मदा परिक्रमावासी डॉ. नितू पाटील यांनी दिला आहे. भीषण अपघातात त्यांचा उजवा हात, विशेषतः मनगटाचा भाग फ्रॅक्चर झाला.

हाडावर शस्त्रक्रिया करून प्लेट बसवावी लागली. नेत्रशस्त्रक्रियेसाठी हाताची सूक्ष्म हालचाल आणि स्थिरता अत्यंत महत्त्वाची असतानाही त्यांनी अवघ्या ५५ दिवसांत पुन्हा नेत्रसेवा सुरू केली आहे. अपघातानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करता येईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, ‘उजव्या हाताचे हाड तुटले, मनगटात प्लेट बसली तरी मी पुन्हा ऑपरेशन करू शकेन,’ असा ठाम आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
अखेर त्यांच्या जिद्दीला कृतीची जोड मिळाली असून त्यांनी पुन्हा रुग्णसेवेला सुरुवात केली आहे. २०११ पासून अखंड सेवायज्ञ! जानेवारी २०११ मध्ये त्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रसेवेची जबाबदारी स्वीकारली. ग्रामीण भागातील गरीब, वयोवृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोतीबिंदू उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी गावोगावी नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन सुरू केले. पहाटे पाच वाजल्यापासून रुग्णसेवेला सुरुवात करणे, शिबिरांचे नियोजन आणि शस्त्रक्रियांची जबाबदारी सांभाळणे हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनला.
आजवर त्यांनी ३२ हजारांहून अधिक रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करून त्यांच्या आयुष्यात दृष्टीचा नवा प्रकाश निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यामुळे हजारो रुग्णांना पुन्हा आपल्या कुटुंबीयांना पाहण्याचा आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा आनंद मिळाला आहे.
रुग्णालयात असतानाही शिबिराचे नियोजन!
अपघातानंतर उपचार घेत असतानाही त्यांचा रुग्णसेवेचा ध्यास कायम होता. रुग्णालयात दाखल असतानाच त्यांनी चोपडा तालुक्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे नियोजन सुरू ठेवले. स्वतःच्या वेदनांपेक्षा रुग्णांची सेवा खंडित होऊ नये, ही त्यांची तळमळ यातून दिसून आली.अखेर ५५ दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा नेत्रसेवेच्या कार्याला सुरुवात केली. अपघाताने त्यांच्या शरीराला काही काळ थांबवले, मात्र रुग्णसेवेची जिद्द आणि सेवाभावाला थांबवू शकला नाही. त्यांचे हे पुनरागमन सहकारी, रुग्ण आणि हितचिंतकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.









