जळगाव बसस्थानक परिसरातील धक्कादायक प्रकार
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेऊन, ‘तुमचा शनी उतरवून देतो’ असे आमिष दाखवत दोन भामट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन विठोबा सजेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी, खोटे नगर, जळगाव) हे २० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या मुलीकडे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबले होते. यावेळी दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी गजानन सजेराव यांना बोलण्यात गुंतवून “तुमच्यावर शनीचा प्रभाव आहे, आम्ही तो काढून देतो,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
भामट्यांनी त्यांना बसस्थानकातील बंद असलेल्या पोलीस चौकीच्या आडोशाला नेले. तिथे सजेराव यांच्या हातातील ४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत २५,४३० रुपये) आणि खिशातील ९०० रुपये रोख असा एकूण २६,३३० रुपयांचा मुद्देमाल स्वतःकडे घेतला. त्याबदल्यात सजेराव यांच्या हातात एक कडे दिले आणि त्यांना मागे न पाहता पुढे चालत जाण्यास सांगितले. सजेराव पुढे गेल्यानंतर दोन्ही भामट्यांनी तिथून पळ काढला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गजानन सजेराव यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी पोलीस नाईक राजेश पदमर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहे.
बसस्थानक सारख्या सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भामट्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.









