तोतयेगिरी केली म्हणून गुन्हा दाखल, मेहुणबारे पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील जामदा येथील माध्यमिक विद्यालयात वन अधिकारी असल्याचे भासवून मुलांना वह्या वाटप करताना एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन रविन्द्र पगारे (वय ३२, रा. बहाळ रथाचे, ता. चाळीसगाव) असे या इसमाचे नाव आहे. तो जामदा येथील माध्यमिक विद्यालयात वह्या वाटप करीत होता. त्याने त्याच्याकडील मोबाईल मधील वनाधिकारीचा गणवेश घातलेला फोटो व बनावट ओळखपत्र मुख्याध्यापक ज्ञानदेव ठोके यांना दाखविला. मात्र संशय आल्याने मुख्याध्यापक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना माहिती दिली.
त्यानुसार वनविभागाची बदनामी होत असल्याने तोतयेगिरी केली म्हणून शीतल नगराळे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा गुरुवारी २० रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक प्रताप मथुरे करीत आहेत.