जळगावातील खोटे नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर एकटाच राहत असलेल्या अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळपासून तो घराबाहेर दिसला नाही म्हणून घरमालक दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याला बघण्यास गेले असता, तेव्हा घटना उघडकीस आली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात तीन बहिणी आहे.
बाळासाहेब लोटन पवार (३५, रा. खोटेनगर) असे या तरुणाचे नाव आहे. औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत तो कामाला होता. बाळासाहेब पवार याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा तरुण जळगावातील खोटेनगरात भाडेतत्वाच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला पहायला गेले. तेव्हा त्यांना हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्या वेळी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली.
त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तरुणाला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या तरुणाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. बाळासाहेब पवार याला तीन बहिणी असून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.