भुसावळ येथे झाली कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक तत्कालचे तिकीट जप्त करण्यात आले आहे.
जाहिद अली इकबाल अली सय्यद (वय ३४, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक पि.के. दीक्षित आणि जितेंद्र कुमार मिश्रा व त्यांच्या पथकाने दक्षिण बाजूच्या रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ तपासणी केली. तिथे खिडकी क्रमांक १ जवळ १ व्यक्ती तिकीट काढून घाईघाईत जाताना त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्याला संशयास्पद स्थितीत पोलीस स्टेशनला आणले. तेव्हा त्याच्याकडून एक तत्कालचे तिकीट मिळून आले आहे. कमिशन मिळण्याच्या आमिषाने लोकांकडून अधिक पैसे घेऊन एजंटगिरी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. के. सिंह करीत आहेत.