राज्य शासनाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे सचिव व सचिव समकक्ष दर्जाच्या कार्यकारी संचालक, महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी निघाले आहेत. यात तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रमोद गोविंदराव मांदाडे यांची नाशिक येथील महाराष्ट्र अभियंत्रिकी संशोधन संस्थेच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रुजू व्हावे. पदभार स्वीकारल्याची माहिती शासनाला कळवावी, असे परिपत्रकात उप सचिव उद्धव दहिफळे यांनी म्हटले आहे. नाशिक येथील महाराष्ट्र अभियंत्रिकी संशोधन संस्थेच्या (संकल्पना, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता) महासंचालकपदी प्रमोद मांदाडे आता काम करतील. मांदाडे यांच्या रिक्त होणाऱ्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार मंत्रालयातील जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय मधुकर बेलसरे हे पुढील आदेश होईपर्यंत पाहणार आहेत.