जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, निर्मात्यांविरोधात घोषणाबाजी
जळगाव (प्रतिनिधी) – सध्या महाराष्ट्रभरात “बाईपण भारी देवा” हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील एका वादग्रस्त दृश्याला वगळावे यासाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोमवारी दि. १७ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर निर्मात्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, “बाईपण भारी देवा” या सिनेमाचे कथानक जरी चांगले असले व निर्मात्याचा उद्देश उत्तम संदेश देण्याचा असला तरी देखील या सिनेमात एक चूक केलेली दिसून येत आहे. ही चूक महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असे आमचे मत आहे. या सिनेमामध्ये मुख्य पात्रांमध्ये असलेल्या महिला या एक दिवस दारू पितात आणि या दारूच्या नशेच्या बळावर नृत्य देखील करतात असे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या एका दृश्यामध्ये मोड सासू वाईन पिताना दाखवलेले आहे . महाराष्ट्रातील महिला दारू पितात, असा चुकीचा संदेश यातून जातो.
तसेच दारू पिणे हे शरीरासाठीच नव्हे तर कुटुंबीयांसाठी खूप धोकादायक असते व संसाराची राख रांगोळी करणारे असते. त्यामुळे या सिनेमातील दारू पिण्याचा भाग वगळावा. कारण, चित्रपट पाहून अनेक जण अनुकरण करतात. यापूर्वीही अनेक सिनेमांबाबत असे झाले आहे. त्यामुळे यापुढे मराठी सिनेमातील विविध दृश्यात गरज नसताना उगाच व्यसने दाखवली जाऊ नये. याबाबत आपल्याकडून निर्मात्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देताना संचालक नितीन विसपुते, आनंद विसपुते, विजय वानखेडे, चेतना विसपुते, प्रियांका देशमुख, आशा पाटील, नीरज पाटील, विद्या ठाकूर, निलेश काळे, मीना मोरे, रमेश मोरे, प्रतीक पिंगळे, तुषार ठाकूर आदी उपस्थित होते.