यावल बाजार समितीचा निर्णय
यावल (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा दि.१४ जुलै रोजी घेण्यात आली. सभेत, केळीवर आकारण्यात येणारी तीन टक्के सूट रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे निर्णयाचे शेतकरी बांधवानी स्वागत केले आहे.
व्यापारी जबरी पद्धतीने सूट आकारित असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी. त्यावर बाजार समिती निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल असे सभापती हर्षल पाटील यांनी सभेत सांगितले. केळीचे मोजमाप झाल्यानंतर गाडीचे वजन इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर करण्यात येत होते. त्यावर व्यापाऱ्यांकडून तीन टक्के सूट म्हणजे कटती शेतकऱ्यांकडून कापण्यात येत असे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकूण वजनात तीन टक्के इतके आर्थिक नुकसान होत होत होते. या गोष्टीकडे बाजार समितीने लक्ष ठेवत शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यासाठी मासिक सभेत शेतकऱ्यांकडून कापल्या जाणाऱ्या तीन टक्के सूट यापुढे घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला.
याबाबत तक्रार उद्भवल्यास व्यापाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव पारित करण्यात आला. यासंबंधीचे पत्र बाजार समितीच्या वतीने सर्व परवानाधारक केळी व्यापारी, कमिशन एजंट यांना माहितीस्तव देण्यात आली आहे. तीन टक्के सूट केल्याचा निर्णयाचे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.