शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – विविध आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील दोन महिलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठा दिलासा मिळाला आहे. एका महिलेला पित्ताशयाची शस्त्रक्रिया दुर्बिणीने करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत, महिलेच्या शरीरात चिटकलेले आतडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून मोकळे करण्यात शल्यचिकित्साशास्त्र विभागातील वैद्यकीय पथकाला यश मिळाले आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
४५ वर्षीय नजमा या महिलेलादेखील पोटदुखीचा त्रास जाणवत होता. या महिलेची तपासणी केली असता, पित्ताशयात खडे व पस दिसून आले. त्यामुळे तातडीने लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून पित्ताशयाची पिशवी काढून सदर महिलेला दिलासा देण्यात आला.
दुसऱ्या घटनेत, राधाबाई या ४८ वर्षीय महिलेला पोटात दुखण्याचा त्रास होत होता. त्यासाठी रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली असता तिच्या शरीरात आतडे हे विविध अंगांना चिटकलेले दिसून आले. त्यामुळे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून आतडी मोकळी करीत महिलेला दिलासा देण्यात आला.
दोन्ही महिलांवर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील, डॉ. महेंद्र मल, डॉ. ज्ञानोबा होळंबे, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. सुनील गुट्टे यांच्यासह इन्चार्ज परिचारिका सुरेखा महाजन, नीला जोशी यांनी परिश्रम घेतले. त्यांना विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकीत्साशास्त्र विभागात लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असुन लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला कमीत कमी वेदना होतात, लहान व्रण असतात, रुग्णाला कमी दिवस ॲडमिट रहावे लागते व रूग्ण लवकर कामाला रुजू होऊ शकतो. पित्ताशय, अपेंडीक्स, हर्निया संबंधित शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केल्या जातात तरी गरजू रूग्णांनी संपर्क करावा असे आवाहन शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. रोहन पाटील यांनी केले आहे.