तळेगावजवळील घटना; भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नीसह चिमुकली जखमी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने पती-पत्नीसह सहा वर्षीय मुलगी जखमी झाल्याची घटना चाळीसगाव-नांदगाव मार्गावरील तळेगावजवळ घडली. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुखडिया कना सोलंकी (वय ३६, रा. पिसनावल, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) हे पत्नी रामबाई सोलंकी (वय ३५) आणि मुलगी तनिषा सोलंकी (वय ६) यांच्यासह एमएच-२० जीबी-२४०४ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीने चाळीसगावहून नांदगावकडे जात होते.
७ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तळेगाव गावाजवळील हॉटेल नक्षत्रसमोर समोरून येणाऱ्या एमएच-०१ बीबी-६६४५ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने भरधाव वेगात दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुखडिया सोलंकी, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









