रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने महाविकास आघाडीत चलबिचल !
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त नुकतेच जळगाव जिल्ह्यात येऊन गेले . यात अनेक मतदार संघात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येऊन काँग्रेस , भाजपसह अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला . तर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळकटी मिळाली असल्याचे चित्र असले तरी दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एका गोटात खडसे यांच्या प्रवेशाने चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे .
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त स्वागतासाठी लागलेल्या बॅनर वरून वाद झाला. जळगावचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लावलेल्या भव्य पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो नसल्याने गटबाजीचे उघड प्रदर्शन झाले. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर खडसेंचा फोटो नसलेलं पोस्टर उतरवून नव्याने पोस्टर लावण्याची नामुष्की नेत्यांवर आली. जळगाव ग्रामीण मेळाव्यात पोस्टरवर फोटो न लावल्याने जयंत पाटील यांच्यासमोर नेत्यांची शाब्दिक चकमक उडाली. शेवटी प्रदेशाध्यक्षांना वाद मिटवावा लागला. मात्र उघडपणे एकनाथराव खडसे यांना कोणी विरोध करीत नसल्याने छुप्यारितीने त्यांना विरोध करणारा गट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे . तसेच दुसरीकडे मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत आगामी तिकीट हे रोहिणी खडसे यांना देणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने मुक्ताईनगर मतदारसंघाचे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . म्हणजेच आ. चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचा घटक असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम होणे स्वाभाविक आहे . आता राष्ट्रवादीने रोहिणी खडसेंना थेट उमेदवारीच जाहीर केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेत झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपच्या उमेदवार असताना मागच्या वेळेस आमच्याकडून चूक झाली, नाहीतर त्या निवडून आल्या असत्या. मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत मोठया मताधिक्याने निवडून आणू अस जाहीर आश्वासन त्यांनी दिलं.
त्यामुळे आगामी काळात या मतदार संघाच्या उमेदवारीवरून राज्य पातळीवर चांगलीच वादाची ठिणगी पडू शकते . तर दुसरीकडे एकनाथराव खडसे यांना मानणारे त्यांचे भुसावळात भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. जामनेर , रावेर ,जळगाव यासह जिल्ह्यातून अनेकांचे राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे ‘इनकमिंग ‘ सुरु झाले आहे . त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा जोश नक्कीच वाढला असून ना. जयंत पाटील यांच्या जिल्हा दौऱ्याने निश्चितच राष्ट्रवादीला बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे असेच म्हणावे लागेल !