अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवखेडा येथील निलेश उर्फ ओम युवराज पाटील या १५ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची अमळनेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
निलेश हा काही कामानिमित्त रात्री ८ ते साडे आठ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे काकांच्या घरी त्याचा मोठा भाऊ अनिल सोबत गेला होता. तिथेच त्याला सर्पदंश झाला. मात्र लक्षात न आल्याने दुर्लक्ष झाले आणि बराच वेळ वाया गेला. थोड्या वेळाने त्याला त्रास होऊ लागल्याने निलेशला वावडे येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्रात दाखविले. तेथील डॉ. विजय ठाकरे यांनी तपासले असता, त्यांना सर्पदंशाची शंका आली आणि ताबडतोब अमळेनर येथे वरिष्ठ डॉक्टरांना दाखविण्याचा सल्ला दिला.
निलेशला अमळनेर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखविले असता, तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.
जवखेडा येथील विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकणारा निलेश हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. निलेशच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.